lawyer caught while accepting bribe : सहायक सरकारी वकील जनार्दन मनोहर बोदडे यांना मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात तक्रारदाराकडून एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना 28 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली.
मेहकर (जि. बुलढाणा) : सहायक सरकारी वकील जनार्दन मनोहर बोदडे यांना मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात तक्रारदाराकडून एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना 28 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली.
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत च्या एका प्रकरणात आरोपीला शिक्षा होईल, अशी बाजू मांडण्यासाठी एका व्यक्तीकडून सरकारी वकील जनार्दन बोदडे (वय ६१) यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तडजोडीअंती अडीच लाख रुपये ॲड. बोदडे यांना यांना देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे एक लाख रुपयांचा पहिला हप्ता जनार्दन बोदडे यांनी मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी स्वीकारला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सापळा रचला होता. त्यांनी बोदडे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम सात अन्वये आठ जनार्दन बोदडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी वकिलाने एखाद्या व्यक्तीकडून लाच स्वीकारण्याची मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयातील ही पहिलीच घटना आहे.
यांनी केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप,अप्पर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पडवाड, खात्याचे कर्मचारी विनोद मारकडे,आसिफ शेख, योगेश खोटे ,रवींद्र घरत, मिलिंद अन्नकेशल यांनी सदर कारवाईत भाग घेतला .