Jarange Patil’s hunger strike : खासदार कल्याण काळे यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपेही आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील खासदार, आमदार यांनी मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी गाव गाठल्याचे दिसून येत आहे. कारण, आज 10 जून रोजी खासदार कल्याण काळे यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपेही आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवार 8 जूनपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली सराटीतील या उपोषणाचा आज तिसरा असून, तिसऱ्या दिवशी आमदार, खासदारांनी आंतरवाली सराटी गाठत जरांगेंची भेट घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल होऊन त्यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली आहे.
आतापर्यंत या नेत्यांनीही घेतल्या जरांगेंच्या भेटी
याआधी परभणीचे खासदार संजय जाधव, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर आज जालन्याचे खासदार कल्याण काळे, शरद पवार पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.