India-UK Partnership : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे.

मुंबई : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले असून, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील राजभवन येथे 8 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर नरेंद्र मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी बोलत होते. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, यावर्षी जुलै महिन्यात माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर सहमती दर्शविली. या करारामुळे व्यापार आणि रोजगार निर्मिती वाढेल आणि ग्राहक तसेच उद्योग क्षेत्र दोघांनाही लाभ मिळेल. ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ ही भागीदारीतील नव्या ऊर्जेचे द्योतक असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींची शिखर परिषद, सीईओ मंच आणि जागतिक फिनटेक महोत्सव यांच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, आजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये इंडो-पॅसिफिक आणि पश्चिम आशियातील स्थैर्य, तसेच युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण झाली. युक्रेन आणि गाझाच्या मुद्दयावर भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता पुनप्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नाचे समर्थन करतो. इंडो पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारत-युके भागीदारीचा नवा अध्याय : कीर स्टार्मर
भारत आणि ब्रिटन यांच्यातील मानवी बंध हेच या नात्याचे खरे वैशिष्ट्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, हे दोन देशांदरम्यानचे, लोकांदरम्यानचा, मनांदरम्यानचा जिवंत पूल आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गुरूवारी मुंबईत आयोजित द्विपक्षीय बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनादरम्यान सांगितले. कीर स्टार्मर म्हणाले, भारत-युके एकत्र येऊन आधुनिक आणि भविष्याभिमुख भागीदारी निर्माण करत आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. युके-भारत सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार पूर्ण करणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. या करारामुळे आयात शुल्क कमी होईल, बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश मिळेल, रोजगारनिर्मिती होईल आणि दोन्ही देशांतील जनतेचे जीवनमान उंचावणार आहे. कराराच्या आर्थिक लाभांपलीकडे जाऊन, या प्रक्रियेत निर्माण झालेला आत्मविश्वास आणि परस्पर सहकार्याचा भाव हे भारत-युके संबंध अधिक दृढ करत असल्याचेही कीर स्टार्मर यांनी नमूद केले.
ब्रिटनची 9 विद्यापीठे भारतात कॅम्पस उघडणार
ब्रिटनची 9 विद्यापीठे भारतात आपला कॅम्पस सुरू करतील. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी मुंबईत ही घोषणा केली. संरक्षण सहकार्याच्या क्षेत्रात, भारत आणि ब्रिटनने लष्करी प्रशिक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्या अंतर्गत भारतीय हवाई दलाचे उड्डाण प्रशिक्षक आता ब्रिटिश रॉयल एअर फोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील.
