जालना : येथील तालुका भूमिका अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक आणि मोजणी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवार, 10 मे रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली.

जालना : येथील तालुका भूमिका अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक आणि मोजणी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवार, 10 मे रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली.
याबाबत विष प्राशन केलेल्या शेतकर्यांचा मुलगा कृष्णा खंदारे यांनी सांगितले की, त्यांचे वडील उत्तम खंदारे यांची पुणेगाव ( ता. जालना ) शिवारातील गट क्रमांक 52 मधील शेत जमिनीच्या मोजणी आणि टोच नकाशासाठी तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक श्रीवास्तव, आणि मोजणी अधिकारी वैभव फोलाने यांनी पैशांची मागणी केली होती. वडिलांनी त्यांना 7 हजार रुपये दिलेले होते. तरीही ते फोन करून पैशांची मागणी करत होते. शनिवारी देखील कार्यालयाला सुट्टी असताना भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकार्यांनी वडिलांना जालना येथे बोलावले होते. वडील येथे आले असता हे अधिकारी येथे आलेच नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून माझ्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खंदारे यांनी केला. याबाबत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे कृष्णा खंदारे यांनी सांगितले.
आरोप निराधार : श्रीवास्तव
पैसे मागितल्याचा आरोप निराधार असून असे काहीही नाही. 28 एप्रिल रोजी त्यांच्या शेताची मोजणीची तारीख होती. मात्र, तांत्रिक अडचण आल्यामुळे मोजणी अधिकारी वैभव फोलाने यांना मोजणी करता आली नाही, अशी प्रतिक्रिया तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक श्रीवास्तव यांनी सांगितले.