Hair loss case in Shegaon: शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार दिसून आले आहेत. हे केसगळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत. तसेच पाण्यामुळेही झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर साकोरे यांनी दिली.
बुलढाणा : शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार दिसून आले आहेत. हे केसगळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत. तसेच पाण्यामुळेही झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर साकोरे यांनी दिली.
विधीमंडळ अधिवेशनात गुरूवारी अल्पकालीन चर्चेदरम्यान सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. चर्चेमध्ये सदस्य किशोर दराडे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला. शेगाव येथील केसगळतीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या की, या केसगळतीचा प्रकार समोर आलेल्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणी, माती, रक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याच्या तपासणीसाठी आयसीएमआर कडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर हे केसगळतीचे प्रकार कशामुळे घडत आहेत हे स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या गावांमधील लहान मुले तसेच गर्भवती महिला यांचीही आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. असेही राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे यांनी सभागृहात सांगितले.