वाशिम : अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेदरम्यान भर पावसात रिसोड तालुक्यातील महागाव परिसरासह बाळखेड, वाकद आदी गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

राज्यातील अतिवृष्टीमुळे सर्वाधिक हानी नांदेड जिल्ह्यात झाली असून, दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नुकसान वाशिम जिल्ह्यात झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सुमारे ३५० गावे बाधित झाली आहेत. अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली असून, काही ठिकाणी मानवी जीविताचीही हानी झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. रिसोड तालुक्यातील शिवाराची पाहणी करताना खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, हळद, कपाशी यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या हतबल परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री भरणे म्हणाले की, “शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. बाधितांना वेळेत मदत पोहचवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून नुकसानभरपाईसाठी तातडीने पावले उचलली जातील.” यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.