Former PM Dr. Manmohan Singh passes away : भारताचे माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह (९२) यांनी गुरुवार २६ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने गुरुवारी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह (९२) यांनी गुरुवार २६ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने गुरुवारी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी डॉ. मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द
मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे १४ वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.
मनमोहन सिंह १९६९-७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे १९८२ ते १०८५ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर १९८५-८७ या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच १९९० ते १९९१ या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर १९९१ मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
सन २००४ साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर २००९ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.