सिंदखेडराजा : संत चोखोबांच्या जन्मस्थानाचा विकास जन्मोत्सवाच्या प्रणेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल.

दीपक नागरे / सिंदखेडराजा : संत चोखोबांच्या जन्मस्थानाचा विकास जन्मोत्सवाच्या प्रणेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. त्यासाठी आपापसातील हेवेदावे विसरण्याचे आवाहन आ. मनोज कायंदे यांनी केले.
संत चोखोबांचा ७५७ व्या जन्मोत्सव सोहळा १४ जानेवारी रोजी देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा येथे पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणात आ. कायंदे म्हणाले, अध्यात्माला विज्ञानाची जोड देत विकासपथावर मार्गरत राहण्याची गरज असून, हा जन्मोत्सव लोकोत्सव होण्यासाठी पुढील जन्मोत्सव तीन दिवसांचा असेल असे अभिवचन त्यांनी दिले. मागील काळात माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आणलेल्या साडेचार कोटी निधीचाही उल्लेख त्यांनी केला. सर्वप्रथम गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या पालखीचे रुपांतर सभेत झाले. त्यानंतर, प्रास्ताविक मुकेश माहोर यांनी तर सूत्रसंचलन व्हि. एस. जाधव यांनी केले. याप्रसंगी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. तोताराम कायंदे, माजी आ. शशिकांत खेडेकर, उषा खेडेकर, कुमठे, सरपंच नंदा बोंद्रे, संतोष खांडेभराड, माजी जि. प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, प्रा. कमलेश खिल्लारे, भगवान मुंढे, देविदास ठाकरे, राजू चित्ते, प्रवीण गीते, दिलीप सानप, प्रकाश गीते, बाबुराव काकड, राजेंद्र डोईफोडे, गजानन काकड, भगवान खंदारे, मंदाताई मेहेत्रे, धर्मराज हनुमंते, निशिकांत भावसार, राजेश भुतडा, विकास गवई, गणेश डोईफोडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले आदी मान्यवर हजर होते. मान्यवरांच्याहस्ते सकाळी साडेसात वाजता चोखोबांची महापूजा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय धर्तीवर संशोधन केंद्र निर्माण व्हावे – हर्षवर्धन सपकाळ
जन्मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जन्मोत्सवाचा इतिहास कथन करीत, विकास आराखड्याचे प्रारुप नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर कसे करता येईल? तसेच बार्टीचे उपकेंद्र मेहुणाराजा येथे निर्माण करावे. त्यामाध्यमातून संशोधन करण्यासाठी ग्रंथालय, अभ्यासिका उभारण्यात याव्या. संशोधन करण्यासाठी येणाऱ्या देशविदेशातील व्यक्ती इथे मुक्कामी राहण्याची व्यवस्था व्हावी अश्या अनेक अपेक्षावजा सूचना केल्या. याप्रसंगी बोलताना प्रवर्तक व चोखासागर नामनिर्माते प्रा. कमलेश खिल्लारे यांच्यासह तोताराम कायंदे, बाबुराव नागरे, बाबुराव काकड आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.