मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. मात्र, ५८ वर्षांनंतर पहिल्यांदाच विधिमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना होणार आहे. त्यामुळे विरोधकांची सरकारविरुद्धची लढाई नेतृत्वहीन होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. मात्र, ५८ वर्षांनंतर पहिल्यांदाच विधिमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना होणार आहे. त्यामुळे विरोधकांची सरकारविरुद्धची लढाई नेतृत्वहीन होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. अधिवेशनात विरोधकांकडे नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि मतदार यादीतील त्रुटींवरून राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. परंतु, विधानसभेतील संख्याबळ महायुती सरकारच्या बाजूने असल्याने हे ज्वलंत मुद्दे किती प्रभावीपणे मांडले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक निर्णयही बहुतमताच्या बळावर रेटून नेले जाऊ शकतात.
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमुळे लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा अधिवेशनावर प्रभाव जाणवणार आहे. सरकारला नवीन घोषणा करता येणार नसल्याने पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि पूर्वनिश्चित कार्यक्रमांवरच भर राहणार आहे. दुसरीकडे, निवडणुकांदरम्यान भाजप आणि शिंदे गटात प्रकर्षाने दिसून आलेला विसंवाद विरोधक अधोरेखित करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सत्तारूढ पक्षावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशीच पुरवणी मागण्या
८ ते १४ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर होणार आहे. १० आणि ११ डिसेंबरला या मागण्यांवर चर्चा होईल, तर त्याच दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. १२ आणि १३ डिसेंबरला शासकीय कामकाज होण्याची शक्यता असून अखेरच्या दिवशी, १४ डिसेंबरला अशासकीय कामकाजासाठी वेळ राखीव ठेवला आहे.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे कारण स्पष्ट करताना वडेट्टीवार म्हणाले की, “परंपरेनुसार विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले जाते. आम्हाला वैयक्तिक निमंत्रणे मिळाली, मात्र संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मनमानी कारभार करू पाहणाऱ्या सरकारच्या चहापानाला जाणे आम्हाला योग्य वाटत नाही.”
ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही : मुख्यमंत्री
“विरोधी पक्षाचा सगळ्या संविधानिक संस्थांवर विश्वास उरला नाही. त्यांच्यावर आगपाखड करण्याचे काम ते करत आहेत. आता त्यांना राज्य दिवाळीखोर दाखवण्याची घाई झाली आहे. मी त्यांना स्पष्ट सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेले नाही. ज्या योजना आम्ही हाती घेतलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. ९२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष जे जे प्रश्न विचारेल त्याला समर्पक उत्तर आम्ही देऊ. राज्य सरकारची पळून जायची मानसिकता नाही,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
