जालना : ‘माझ्या गावाला पाणी द्या.. गावाला पाणी द्या…’ अशी विनवणी करीत एका गावकऱ्याने चक्क जालना जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. मंगळवार, 15 एप्रिल रोजी दुपारी हा थरार घडला. यावेळी जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.

जालना : ‘माझ्या गावाला पाणी द्या.. गावाला पाणी द्या…’ अशी विनवणी करीत एका गावकऱ्याने चक्क जालना जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. मंगळवार, 15 एप्रिल रोजी दुपारी हा थरार घडला. यावेळी जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.
केन्द्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेतून जालना जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू असल्याचे ‘दैनिक महाभूमि’ ने चव्हाट्यावर आणल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी योजनेतील कामांची चौकशी लावलेली आहे. जालना जिल्ह्यातील बहुतांश गावातील पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठा घोटाळा संगनमताने केल्याचे समोर येत आहे. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातील मछिंद्रनाथ चिंचोली येथील सुंदर मुळक यांनी दुपारी सीईओ यांच्या दालनासमोर गावाला पाणी देण्याची मागणी करून अंगावर डिझेल ओतून स्वतः ला
पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे गेल्या १५ वर्षांपासून भीषण पाणीटंचाई सुरू असून ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावातील नागरिकांना खासगी बोरवेलमधून महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे. महिलांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागते. तर लहान मुलांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थ सुंदर मुळक यांनी १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच आणि इतर संबंधित विभागांना निवेदन देऊन गावातील पाणीटंचाईवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती. गावात पंधरा वर्षांपासून पाणी मिळत नाही.

विहिरी असून ग्रामपंचायतने जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेत दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. मात्र त्याच्या निवेदनावर काहीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सुंदर मुळक यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस आणि जवळील ग्रामस्थांनी त्यांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला. कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मतीन शेख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह सुंदर मुळक यांना वेळीच आत्मदहन करण्यापासून रोखले . यावेळी धर्मवीर रामभाऊ घोगरे, बळी मोरे, बंडू रणमळे, विलास घोगरे, पवन मुळक, ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी होते.
या आहेत मागण्या
गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, जलजीवन योजनेतील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावी, योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.