A baby in the womb of a woman : वैदकीय क्षेत्रात कधी नव्हे ती घडलेली घटना बुलढाण्यात घडली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती असलेल्या एका ३५ वर्षीय गरोदर महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात तपासणी दरम्यान, चक्क अर्भक आढळले.
बुलढाणा : वैदकीय क्षेत्रात कधी नव्हे ती घडलेली घटना बुलढाण्यात घडली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती असलेल्या एका ३५ वर्षीय गरोदर महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात तपासणी दरम्यान, चक्क अर्भक आढळले. शनिवारी हे निष्पन्न झाल्यांनतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षनाने या अभूतपूर्व घटणेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात दररोज शेकडो गरोदर महिला रुग्ण उपचारार्थ दाखल होतात. वर्षाअखेर शहरी, ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो महिलेंची प्रसूती शहरातील धाड नाका रोडवरील स्त्री रुग्णालयात होत असते. मात्र, आतापर्यंत महिलेच्या गर्भातील अभर्काच्या पोटात दुसरे अर्भक आढळणे! असे कधीही घडले नाही. सविस्तर घटना अशी की, २५ जानेवारी रोजी एक गरोदर महिला उपचारासाठी स्त्री रुग्णालयात दाखल झाली. स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांच्या निगराणीखाली महिलेची तपासणी सुरु होती. सोनोग्राफीच्या पहिल्या चाचणीमध्ये गर्भात एक अर्भक असल्याचे दिसले. परंतु, जेव्हा दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली तेव्हा दस्तरखुद्द डॉ. अग्रवाल हे चक्रावून गेले. तेव्हा त्यांना अर्भकाच्या पोटात दुसरे अभर्क दिसून आले. यानंतर, बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. झिने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटिल यांना ही आच्छर्यकारक बाब कळविण्यात आली. तद्नंतर उपरोक्त तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रसाद अग्रवाल यांनी अचूक निदान केले.
नेमका हा प्रकार काय?
प्रसूतीविभागात या प्रकाराला ‘फेटस इन फेटू’ असे म्हटले जाते. बाळाच्या पोटात, बाळ असा याचा अर्थ निघतो. बाळ तयार होण्याच्या प्रक्रियेत गुणसूत्रांमध्ये (Chromosome) अनैसर्गिकता घडून आल्यास असे घडते. या केसच्या उपचारात आधी प्रसूती करायची नंतर, बाळाच्या पोटातील अर्भक काढायचे अशी उपचार पद्धत आहे.
अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भका वाढणे आणि गर्भधारणे पासून याची सुरुवात होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून ५ लाख प्रसूतीमध्ये एखाद्यावेळेस असे घडते. जागतिक पातळीवर आतापर्यंत अशा दोनशे केसेस नोंदविलेल्या गेल्या आहेत. भारतात तर १० ते १५ घटना उघडकीस आल्या. १९८३ साली जगात पहिल्यांदा अशी घटना घडली. त्यानंतर, मोजक्याच ठिकाणी अशा घटना घडल्याची माहिती आहे.
– डॉ. प्रसाद अग्रवाल, स्त्रीरोग तज्ञ, बुलढाणा