जाफ्राबाद : तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या शिक्षण व्यवस्था कोलमडली असून शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शाळा सुरू होऊन २-३ दिवस उलटले तरीही गुरुजी वर्गात अध्यापनाऐवजी टेबलवर पाय ठेवून वर्गातच ढाराढुर.. झोपले असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी गोर-गरीबांची मुले शिक्षणाची आशा बाळगून दररोज शाळेत उपस्थित राहतात. त्यांना वाटते की शिक्षणाच्या माध्यमातून आपण भविष्य घडवू, काहीतरी मोठं करू. मात्र अशा झोपाळू आणि उदासीन वृत्तीच्या शिक्षकांमुळे त्यांच्या आशा – अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे. शैक्षणिक सत्र सुरु होवून जेमतेम आठवडा लोटण्याच्या आतच जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करण्याऐवजी वर्गातच टेबलवर पाय ठेवून झोपले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, शिक्षकांच्या या मरगळलेल्या भूमिकेमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावत असून याकडे राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्गातच झोपा काढणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गाडेगव्हाण येथील पालकांसह नागरिकांतून करण्यात येत आहे. तसेच वेळप्रसंगी लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गाडेगव्हाण यंथील ग्रामस्थांनी दिला आहे.