मानोरा : तालुक्यातील ईंझोरी परिसरातील असंख्य पात्र घरकुल लाभार्थ्यांनी लोकांकडून कर्ज व सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन घरांचे बांधकाम पूर्ण केले. मात्र शासनाकडून मंजूर झालेले घरकुलाचे हप्ते अनेक महिन्यांपासून थकल्याने लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांसह १९ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन करत शासन व प्रशासनाचा निषेध केला.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांअंतर्गत ईंझोरी परिसरासह तालुक्यातील पाच महसूल मंडळांतील शेकडो नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहे. पहिला हप्ता मिळाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी दुसरा व तिसरा हप्ता मिळेल या अपेक्षेने खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलून घरांचे बांधकाम केले. मात्र अपेक्षित हप्ते वेळेवर न मिळाल्याने कर्जाचा डोंगर वाढत असून व्याज कसे फेडावे, या चिंतेत लाभार्थी सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची माहिती १३ तारखेला लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबला. थंडीच्या दिवसांत अनेक गरीब लाभार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ येत असल्याने तातडीने थकलेले हप्ते अदा करावेत, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. प्रशासनाने याप्रकरणी त्वरित दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ईंझोरी परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.