पुणे : जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते. वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठीचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल, अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला, असेही शिंदे म्हणाले.

‘तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करते’
तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची लोकचळवळ व्हावी
नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न शासन करत आहे. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची चळवळ ही लोकचळवळ व्हावी, देशातील सर्वात आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत असा नावलौकिक करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.