जालना : सुनेने सासूचा खून करून मृतदेह गोणीत टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत बुधवार, 2 एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

जालना : सुनेने सासूचा खून करून मृतदेह गोणीत टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत बुधवार, 2 एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शनी कॉलनीत आकाश शिनगारे, त्यांच्या आई सविता पत्नी प्रतीक्षा शिनगारेसह एका भाड्याच्या घरात राहतात. आकाश शिनगारे हे कामानिमित्त लातूर येथे गेलेले आहेत. दरम्यान, आकाश यांची पत्नी प्रतीक्षा शिनगारे हिने तिची सासू सविता शिनगारे ( 45 ) यांच्या डोक्यात गंभीर वार करून हत्या केली आणि मृतदेह एका गोणीत टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सासूचा मृतदेह गोणीत टाकून नेत असताना घर मालकांनी पाहिले असता प्रतीक्षा हिने तेथून पळ काढला. याबाबत घर मालकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. फरार झालेली संशयित प्रतीक्षा शिनगारे हिच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.दरम्यान, सविता शिनगारे यांचे डोके भिंतीवर आपटून किंवा डोक्यात गंभीर वार करून त्यांचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटना रात्री किंवा पहाटेची : नोपाणी
प्रियदर्शनी कॉलनीत राहणाऱ्या शिनगारे कुटुंबातील सासू मयत सविता शिनगारे यांचा खून हा रात्री उशिरा किंवा पहाटे करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. याबाबत उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर अधिक माहिती हाती येईल, अशी माहिती
अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.
सहा महिन्यापूर्वी झाले लग्न
आकाश शिनगारे यांचे बीड जिल्हयातील गेवराई येथील प्रतीक्षासोबत सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. दरम्यान, लग्नानंतर आई सविता शिनगारे यांच्यासह जालना तेथे भाड्याच्या घरात राहत होते. प्रतीक्षा सासूचा मृतदेह गोणीत टाकून फरार झाल्यामुळे पोलिस तिच्या मागावर निघाले आहेत.