Chhatrapati Sambhajinagar Crime News : होमगार्ड ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत या नशा करणाऱ्या तरुणांची दहशत आहे. नेमक्या दिवाळीच्या दिवशी या टोळक्याने दहशद माजवत या भागातील वाहनांच्या चक्क कोयत्याने काचा फोडल्या. यामध्ये काही वाहनचालक जखमी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक भागात नशा करणाऱ्या तरुणांसह बटण गँगची दहशत आहे. नशेच्या आहारी गेलेले तरूण संध्याकाळी आणि रात्री रहिवाशांना आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देत आहेत. अशा घटनांचे लोण आतापर्यंत शांत समजल्या जाणाऱ्या एन १२ , स्वामी विवेकानंद परिसरात सुद्धा दिसून येत आहे. होमगार्ड ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत या नशा करणाऱ्या तरुणांची दहशत आहे. नेमक्या दिवाळीच्या दिवशी या टोळक्याने दहशद माजवत या भागातील वाहनांच्या चक्क कोयत्याने काचा फोडल्या. यामध्ये काही वाहनचालक जखमी झाले आहेत.
होमगार्ड शेजारील मोकळ्या पटांगण म्हणजे या नशेड्यांचा अड्डा झाला आहे. तर रस्त्यावर ऑटोत बसलेले तरूण नशा करत असल्याचे समोर येते. काल या भागातील काही तरुणांमध्ये अण्णाभाऊ साठे चौक ते हिमायतबाग या रस्त्यावर, होमगार्डच्या जवळ वाद झाला. त्यात तरुणांमध्ये हाणामारी झाली. त्यातील एका तरुणाकडे कोयता सदृश्य हत्यार होते. त्याने उभ्या असलेल्या कारची समोरची काच या हत्याराने फोडली. त्यानंतर तेथून जाणाऱ्या वाहनधारकांना या हत्याराच्या सहायाने धमकावण्याचा प्रकार केला. यावेळी ताज हॉटेलमधून कर्मचाऱ्याला ड्रॉप करणाऱ्या एका कारला त्याने थांबवले. त्याच्यावर या हत्याराने हल्ला चढवला. चालकाने प्रसंगावधान राखत काच वर करण्याचा प्रयत्न केला. तसेच कार पुढे दामटल्याने पुढील अनर्थ टळला.
या परिसरातील नागरीक कल्याण देशमुख यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. त्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर कॅब चालकाने सुद्धा सिटीचौक पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
दादा-भाई होण्याचे स्वप्न
या भागातील काही तरुणांच्या डोक्यात दादा-भाई होण्याचे स्वप्न आहे. काही तरुण हे नशेच्या आहारी गेले आहेत. आपली या भागात दादागिरी करण्यासाठी ते सातत्याने रस्त्यावर येऊन धिंगाणा घालतात. पोलिसांच्या राऊंडची वेळ माहिती असल्याने तेवढ्या काळात ते गायब होतात आणि पुन्हा रस्त्यावर येतात. या परिसरातील मोकळं पटांगण हे दारुड्यासाठी खास अड्डा झाला आहे. या दादा-भाईंना आता कोण आवर घालणार असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरीक विचारत आहेत.
दुभाजक ओलांडले की बदलते ठाणे
या परिसरात दुभाजक आहे. अण्णाभाऊ साठे चौकाकडून हिमायत बागकडे जाणारा परिसर हा सिडको एन-७ पोलीस ठाण्यातंर्गत येतो. तर दुभाजक ओलाडल्यावर होमगार्डसह हडको कॉर्नरचा परिसर हा सिटीचौक पोलीस ठाण्यात येतो. या घटनेची वाहनधारकांनी आणि नागरिकांनी १०० क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एन-७ पोलीस ठाण्यात धाव घेतली असता दुभाजकासमोरील परिसर सिटीचौकातंर्गत येत असल्याने त्यांना त्या पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली.