जालना : शहरातील विविध भागांत वीजचोरी करणाऱ्या ३ जणांवर महावितरणने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

जालना : शहरातील विविध भागांत वीजचोरी करणाऱ्या ३ जणांवर महावितरणने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या जालना शहर-१ शाखेचे सहायक अभियंता संजय गहाणे, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र माळवे, वरिष्ठ तंत्रज्ञ ऋषी तिरुखे यांचे पथक वीजचोरीच्या संशयित ग्राहकांची तपासणी करत होते. त्यात जिजाऊनगर, सामनगाव रोड येथील रहिवासी भरत पंडितराव टापरे याने लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडा टाकून घरगुती वापरासाठी ७ हजार ४६० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळले. याच वसाहतीतील राजेश शेषराव कबडे यानेही घरासाठी आकडा टाकून १३ हजार ९५० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळले.
आणखी एका प्रकरणात गहाणे यांच्यासह वरिष्ठ तंत्रज्ञ परसराम गोपणारी हे वीजबिलाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाची पडताळणी करत होते. त्यांनी उत्तमचंदनगर येथील बाबुमियाँ सय्यद या ग्राहकाच्या घरी तपासणी केली असता सदर ग्राहक हयात नसून त्या घरी अनिल सखाराम जायभाये हा राहत असल्याचे समजले. जायभायेने या घरासाठी वीजवाहिनीवर आकडा टाकून २१ हजार ५३५ रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. तिन्ही आरोपींवर सहायक अभियंता गहाणे यांच्या फिर्यादीवरून भारतीय विद्युत कायद्याच्या विविध कलमांन्वये सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.