तीन महिन्यांच्या चिमुकलीचा जन्मदात्यांनीच केला खून; चौथीही मुलगी झाल्यामुळे मातापित्यांनीच विहिरीत टाकून चिमुकलीचा खून केल्याचे निष्पन्न

जालना :  आपण कितीही पुढारलेल्या गप्पा मारत असलो तरीही समाजातील मुलगा मुलगी मधील भेदभाव काही दूर होत नसल्याचे दिसून येते. मुलींच्या जन्माचा इतका तिटकारा की त्यातून जन्मदात्यांनीच त्या मुलीचा खून करावा ! जालना जिल्ह्यात ही अत्यंत लाजिरवाणी घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. 

जालना :  आपण कितीही पुढारलेल्या गप्पा मारत असलो तरीही समाजातील मुलगा मुलगी मधील भेदभाव काही दूर होत नसल्याचे दिसून येते. मुलींच्या जन्माचा इतका तिटकारा की त्यातून जन्मदात्यांनीच त्या मुलीचा खून करावा ! जालना जिल्ह्यात ही अत्यंत लाजिरवाणी घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. 

 बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत शनिवार,12 एप्रिल रोजी एका तीन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

    या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हलविली. अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला की अन्य काही कारणामुळे..? अशा सर्व शक्यतांची पडताळणी करीत पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या मातापित्यांचा डाटा जमविण्यास सुरुवात केली होती.

 दरम्यान, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले यांनी असरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढत असतांना त्यांना या चिमुकलीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले.

 आसरखेडा गावापासून जवळच असलेल्या गारवाडी तांडा ( ता. बदनापूर ) सतीश पंडित पवार आणि त्याची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथे अपत्येही मुलगीच झाल्यामुळे त्यांनी तिला मोटारसायकलवरून येऊन, विहिरीत टाकले. त्यानंतर सतीश पवार याने त्याची पत्नी पूजा हिस वखारी वडगांव ( ता. जालना ) येथे मोटारसायकलवरून नेऊन सोडले होते. चौथीही मुलगी झाल्यामुळे पवार दाम्पत्याला काही जवळचे नातेवाईकही अपमानित करीत असल्याचे समजते. दरम्यान, त्या मयत चिमुकलीच्या मातापित्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट, पोहेकाँ. मदन बहुरे, प्रशांत देशमुख, रवी देशमुख, कृष्णा तंगे, राजू पवार आदींनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »