अंढेरा : अंढेरा बाजार गल्लीत शनिवारी (२५ ऑक्टोबर) रात्री साडेसहा वाजता किरकोळ वादातून तिघा तरुणांनी एका २५ वर्षीय युवकाचा चाकूने सपासप वार करून खून केला. मृत तरुण हा आसोला येथील रहिवासी होता.

नंदकिशोर देशमुख / अंढेरा : अंढेरा बाजार गल्लीत शनिवारी (२५ ऑक्टोबर) रात्री साडेसहा वाजता किरकोळ वादातून तिघा तरुणांनी एका २५ वर्षीय युवकाचा चाकूने सपासप वार करून खून केला. मृत तरुण हा आसोला येथील रहिवासी होता.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिस ठाण्यापासून काहीच अंतरावर ही घटना घडल्याने कायद्याचा धाक संपतोय का? असा सवाल निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच एपीआय रुपेश शक्करगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व डीवायएसपी संतोष खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अल्पावधीत ताब्यात घेतले असून त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.
मृतकाच्या मृत्यूची वार्ता आसोला गावात पोहोचताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंढेरा पोलिस ठाण्यात जमा झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने मेहकर येथील दंगा काबू पथक बोलावण्यात आले असून पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे.
मृत युवकावर रविवार (२६ ऑक्टोबर) रोजी दुपारी बारा वाजता आसोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे अंढेरा परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
