वाशिम : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जाती (एसटी) आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात विविध वाद्यांच्या तालावर केलेल्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.

वाशिम : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जाती (एसटी) आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात विविध वाद्यांच्या तालावर केलेल्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
‘संत सेवालाल महाराज की जय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं’, ‘उठ बंजारा जागा हो, आरक्षणाचा धागा हो’ अशा घोषणांनी शहर दणाणले. मोर्चा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून दुपारी बारा वाजे दरम्यान सुरू होऊन पुसद नाका, बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे सिव्हिल लाईन भागातील मुख्य रस्त्यावर जाहीर सभेत संपन्न झाला. यावेळी वेळी महंत कबिरादास महाराज, प्रा. अनिल जाधव यांच्यासह इतर समाज बांधवांनी मोर्चात सहभागी लाखो समाजबांधवांना संबोधित करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळावे, अशी मागणी ठामपणे मांडली. शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातींची नोंद जमात म्हणून होती. त्या अनुषंगाने तेलंगणा व आंध्रप्रदेशातील बंजारा व लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले आहे. मात्र १९४८ नंतर महाराष्ट्राच्या राज्य पुनर्रचनेत मुळ आरक्षण संपुष्टात येऊन गोरबंजारा समाजाला विमुक्त जातीमध्ये वर्गीकृत केले गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत अन्याय झाला आहे. मराठा-कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारावर आरक्षण लागू होत असताना, गोरबंजारा समाजाला देखील तोच गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. यासाठी राज्यभर सातत्याने आंदोलन, मोर्चा, उपोषण, निवेदन करत न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला असून, जिल्हास्तरीय मोर्चा हा त्या सातत्यपूर्ण संघर्षाचा एक ठळक भाग ठरला आहे.
