Another health crisis in Buldhana: काही महिन्यापूर्वी घाटाखाली केस गळती, त्यानंतर नख गळती अन् आता मेहकर मतदार संघातील शेलगाव देशमुख येथे हातापायाला भेगा या अनोख्या आजाराचे 20 रूग्ण आढळून आले आहेत.
डोणगाव : काही महिन्यापूर्वी घाटाखाली केस गळती, त्यानंतर नख गळती अन् आता मेहकर मतदार संघातील शेलगाव देशमुख येथे हातापायाला भेगा या अनोख्या आजाराचे 20 रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराचे रूग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने 15 जून रोजी त्वचारोग तज्ज्ञांसह शेलगाव देशमुख येथे पोहचून रुग्णांची तपासणी केली.
शेलगाव देशमुख हे पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात एक पाहुणा आला त्याने एका महिलेच्या हाताला पाहून विचारले की काय झाले? तेव्हा त्या महिलेने सांगितले की फक्त माझ्याच हाताला नाहीतर गावातील अनेकांच्या हाता पायाला भेगा पडत असून त्या वाढतात तेव्हा त्या व्यक्तीने ही माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ प्रशांत तागडे यांना दिली. त्यांनी तात्काळ त्वचा रोग तज्ञ डॉ बालाजी आद्रट यांना सोबत घेऊन शेलगाव देशमुख गाठले. शेलगाव देशमुख येथील आरोग्य अधिकारी डॉ माधुरी मिश्रा, डोणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ राम गायकवाड, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली असता, गावातील 20 ते 25 नागरिकांच्या हाता पायाला भेगा पडल्याचे दिसून आले. या आजारामुळे रूग्णाला खाज येते. आरोग्य पथकाने माहिती घेतली असता हा आजार काहींना वर्षभरापासून तर काहींना 5 वर्षापासून असल्याचे पुढे आले.
हा आजार इसबगोल
हाता पायाला भेगा पडण्याच्या या आजाराचे नाव इसबगोल असून हा आजार संसर्गजन्य नाही. तो एकापासून दुसऱ्याला होत नाही. विविध प्रकारचे प्रतिजन अथवा हानीकारक पदार्थ सेवनात आल्याने असे आजार होऊ शकतात.
– डॉ.बालाजी आद्रट, त्वचारोग तज्ज्ञ
पाण्याचे स्त्रोत तपासणे गरजचे
संग्रामपूर,जळगांव जामोद हा जसा खारपाण पट्टा आहे. तसेच खारे पाणी शेलगाव देशमुख भागात सुद्धा आहे. या गावात अनेक वर्षापासून दोनच विहिरीवरून ग्रामस्थ पिण्याचे पाणी आणतात. इतर पाण्याच्या स्त्रोतात खारे पाणी आहे. त्यामुळे पिण्याचे व वापराचे स्रोत तपासणी करणे गरजेचे आहे.