वाशिम :तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारांबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी सहकार विभाग व पोलिस विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत तीन ठिकाणी झडती घेतली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत ही धडक कार्यवाही करण्यात आली असून बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्याच्या दिशेने प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे.

या कारवाईत अनिल मुरलीधर मोरे यांचे चिखली घुले येथील निवासस्थान, सावरगाव बर्ड येथील फार्महाऊस तसेच साहेबजी नारंग, जवाहर कॉलनी (जुनी आययूडीपी), वाशिम येथील निवासस्थानी झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान पुढील तपासासाठी महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले असून सावकारी कायद्यान्वये पुढील चौकशी सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक अनुज तारे तसेच अमरावती विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. या मोहिमेत सहायक निबंधक आर. आर. सावंत, आर. व्ही. आकुलवार, एम. डी. कच्छवे यांच्यासह सहकार, पोलिस व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.