छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगांव उड्डाणपुलावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले. यामध्ये चौघांचा जागीच तर दोघांचा बीड जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहा पैकी पाच मयत बीड तर एक अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. आज सकाळी 7 वाजता बीड पासून 29 कि.मी. अंतरावर असलेल्या नामलगांव शिवारात ही दुदैवी घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगांव उड्डाणपुलावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले. यामध्ये चौघांचा जागीच तर दोघांचा बीड जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहा पैकी पाच मयत बीड तर एक अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. आज सकाळी 7 वाजता बीड पासून 29 कि.मी. अंतरावर असलेल्या नामलगांव शिवारात ही दुदैवी घटना घडली.
दिनेश दिलीप पवार (रा.माऊलनगर बीड), पवन शिवाजी जगताप (रा.अंबिका चौक बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा.शिदोड ता.बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा ता.गेवराई, जि.बीड), आकाश अर्जुन कोळसे (रा.रिलायन्स पंप परिसर बीड), विशाल श्रीकिसन काकडे वय 22 रा. शेकटा ता.शेवगांव) अशी मयतांची नावे आहेत.
आज सकाळी बीड येथून पेंडगाव येथे हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी ते पायी जात होते. बीड ते नामलगांव असा प्रवास केल्यानंतर पाठीमागून आलेल्या आणि उड्डाणपुलावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक (एमएल-01 एजी-3197) ने या भाविकांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या आणि परिसरातील नागरिकांनी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या दोघांचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चालकांना ठेवले पकडून
अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी कंटेनरच्या चालकासह अन्य एकाला पकडून ठेवले. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे, प्रसाद कदम यांच्यासह महामार्ग पोलीस गजानन जाधव, बालाजी ढगारे, तात्या बांगर, यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले.
राष्ट्रीय नव्हे मृत्यू मार्ग..!
मराठवाड्यात समृध्दी महामार्गानंतर सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यू मार्ग म्हणून समोर येत आहे. काही दिवसापूव गढी येथील उड्डाणपुलावर अशाच प्रकारे एका जड वाहनाने पाच ते सहा जणांना चिरडले होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमधून पाणी आणण्यासाठी गेलेल्या वडिलांकडे रस्ता ओलांडून जाणाऱ्या एका चिमुकल्याचा भरधाव कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला होता. आज सकाळी पुन्हा घडलेल्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या महामार्गाला सर्व्हिस रस्ता नसल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षेबाबत अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधीत विभागाला दिल्याचे ट्वीट केले आहे.
