चिखली : तालुक्यातील आमखेड येथील व सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे वास्तव्यास असलेल्या एका युवकाचा पुणे नजीक पवना डॅममध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना 24 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.

चिखली : तालुक्यातील आमखेड येथील व सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे वास्तव्यास असलेल्या एका युवकाचा पुणे नजीक पवना डॅममध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना 24 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.
शिंदी येथे वास्तव्यास असलेले गजानन गवई हे कुटुंबासह कामासाठी पुणे येथे गेले आहेत. त्यांचा मुलगा धीरज वय 27 हा पुणे येथून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवना डॅममध्ये शुक्रवार 24 एप्रिल रोजी मित्रासह पोहण्यासाठी गेला होता. धीरजला अगोदरपासून पोहण्याचा छंद होता. डॅममध्ये पोहण्यासाठी तो एकटाच उतरला. पोहता पोहता पाण्याच्या खोल भागात जाऊन पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे काठावर उभे असलेले त्याचे मित्र बराच वेळ वाट पाहून सुद्धा धीरज वर न आल्यामुळे त्यांनी तेथे असलेल्या लोकांना हा प्रकार सांगितला. काही नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सहकार्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना त्याच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. धीरज हा त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याने ग्रॅज्युएशनपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले होते. गावाकडे असताना सामाजिक कार्यात सुद्धा तो अग्रेसर होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आमखेड व शिंदी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्याच्यावर शनिवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी शिंदी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


