भोकरदन : तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

भोकरदन : तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भरत भीमराव मगरे (३२), रा. कोदोली, असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित मुलगी शाळेत जात असताना, आरोपी भरत भीमराव मगरे याने तिला फूस लावून आपल्या मॅक्झिमो गाडीत बसवले. जालना रोडवरील नांजा रोडच्या दिशेने गाडी वळून एका खाजगी शाळेच्या समोरील एका शेतात नेऊन आरोपीने पीडितेचा हात धरून तिला बळजबरीने ओढत नेले. ओरडलीस तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन आणि तिचे तोंड दाबून आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार समोर येताच
पीडितेच्या कुटुंबाने पोलिसात फिर्याद नोंदवली. या तक्रारीवरून भोकरदन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी भरत मगरे याला ताब्यात घेतले. आरोपीची ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आली. बुधवारी आरोपीला विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे हे अधिक तपास करत असून फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
