भोकरदन : लग्नाचा उत्साह, गाण्यांच्या आणि आनंदी वातावरण… पण एका क्षणात या आनंदाचे रूपांतर अक्राळविक्राळ किंकाळ्यांमध्ये झाले. छत्रपती संभाजीनगरहून निघालेल्या एका वऱ्हाडाच्या गाडीला भोकरदन तालुक्यातील जवखेडा फाट्यावर भीषण अपघात झाला. क्रूझर गाडीने रस्त्यावर तीन ते चार कोलांटउड्या पालट्या घेतल्याने झालेल्या या अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुनील भास्कर रोडे वय ३२, रा. कवडगाव, जि. छत्रपती संभाजीनगर असे मयताचे नाव आहे तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कवडगाव येथून एक वऱ्हाड आनंदाने लग्नासाठी निघाले होते. वऱ्हाडी मंडळी क्रूझर गाडी क्र. MH21-V-0402 मध्ये बसून इच्छित स्थळाकडे जात असताना, रविवारी १ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हसनाबाद जवळील जवखेडा फाट्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. असे सांगण्यात येत असून हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव वेगातील क्रूझरने चक्क तीन ते चार वेळा रस्ता सोडून पालट्या घेतल्या.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गाडीचा चक्काचूर झाला होता आणि आतून जखमींचे आर्त किंकाळ्या ऐकू येत होत्या. स्थानिकांनी मोठ्या शिताफीने जखमींना बाहेर काढले आणि तातडीने हसनाबाद येथील रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात सुनील भास्कर रोडे (वय ३२, रा. कवडगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी भोकरदन येथे हलवण्यात येत होते. मात्र, काळाने वाटेतच घाला घातला आणि उपचारापूर्वीच सुनीलची प्राणज्योत मालवली. सुनीलच्या निधनाने कवडगाव गावावर शोककळा पसरली असून लग्नाच्या घरासमोर आता दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. तर रात्री यांच्यावर अंत्यसंकार होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते
घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सुनीलचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हसनाबाद पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भरत चौधरी हे करत आहेत.
या भीषण अपघातात अन्य ७ ते ८ जण जखमी असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.