वाशिम : बस प्रवासादरम्यान महिलांच्या दाग-दागिन्यांची चोरी रोखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या पुढाकाराने सोमवारी जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. “सावध रहा, सुरक्षित रहा” या संदेशासह वाहतूक पोलिसांनी थेट एस.टी. बसेसमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधत चोरीपासून संरक्षणाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.

या मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार सहभागी झाले होते. बसस्टँड चौक, मानोरा रोड, खेर्डा टोलनाका, अमरावती रोड, शिरपूर रोड, तोंडगाव टोलनाका, हिंगोली रोड, मालेगाव रोड, सावरगाव रोड, मेडशी रोड, जागमाथा, समृद्धी महामार्गाजवळ शेलू बाजार, मानोरा–मंगरुळपीर रोड, लालमाती धाबा परिसर, अनसिंग रोड आदी ठिकाणी बसेस थांबवून महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. पोलीस पथकाने बसमध्ये प्रवेश करून महिलांना त्यांच्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता तपासण्यास, गर्दीत पर्स/पिशवी समोर ठेवण्यास, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ चालक किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले. “क्षणभराची बेपर्वाईही चोरीला आमंत्रण देऊ शकते,” असा सजगतेचा संदेश देण्यात आला.
—
बसस्थानकात ध्वनिक्षेपणाद्वारे सतर्कतेच्या सूचना
दरम्यान, वाशिम शहर बसस्थानकात पोलीस निरीक्षक संतोष शेळके व सहायक पोलीस निरीक्षक नाईक यांनी बसस्थानक प्रमुख इंगोले यांची भेट घेतली. यावेळी महिलांच्या दागिन्यांच्या चोरीच्या वाढत्या घटनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, बसस्थानक परिसरात वेळोवेळी ध्वनिक्षेपणाद्वारे प्रवासी महिलांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले.या जनजागृती मोहिमेमुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली असून, बस प्रवासात दागिन्यांच्या चोरीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.