नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत दावा केला की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या काळात मुस्लिम लीगच्या दबावाखाली वंदे मातरम़चे तुकडे करण्यात आले होते आणि एक दिवस पक्षाला भारताच्या फाळणीपुढे झुकावे लागले. आपल्या पुढच्या पिढ्यांना हे कोणी केले हे सांगणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंवर हल्लाबोल केला.

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. वंदे मातरम राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असताना संसदेने दोन्ही सभागृहांमध्ये विशेष चर्चेसाठी १० तास राखून ठेवले होते. आज लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही शक्तींनी गेल्या शतकात राष्ट्रगीताचा विश्वासघात केला. १९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली.
काँग्रेसकडून पलटवार
पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेसने तात्काळ पलटवार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना विचारले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांनी जिन्ना यांची प्रशंसा का केली होती, याचे उत्तर त्यांनी द्यावे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी १९४० च्या दशकात जिन्ना यांच्यासोबत बंगालमध्ये युती केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. रमेश म्हणाले, पंतप्रधान इतिहासाला तोडून-मोडून सादर करतात, पण ते या प्रश्नांची उत्तरे देतील का?
देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जाते : गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले. पंडित नेहरूंच्या योगदानासंदर्भात बोलताना, जर नेहरुंनी इस्रोची निर्मिती केली नसती, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? असा प्रश्न प्रियांका यांनी उपस्थित केला. सरकारने एकदा नेहरुंवरही चर्चा करायला हवी, असे आव्हानही त्यांनी दिले. वंदे मातरमवरील चर्चेच्या माध्यमातून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, प्रदूषण आदी गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी यावेळी केला.