परतूर : सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही निवडणूक फक्त सत्तेसाठी नसून सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुखमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

परतूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण, सुरेश जेथलिया यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पवार म्हणाले, अनुभवी, तरुण आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सक्षम उमेदवारांची टीम जनसेवेखातर उभी केली आहे. ही निवडणूक फक्त सत्तेसाठी नसून विकासाची दिशा ठरवणारी असल्याचे सांगत परतूरचा विकास हा नियोजनबद्ध तर असायलाच हवा, पण तो सर्व समाजघटकांना सोबत घेणारा असला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पुढील पाच वर्ष निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली.
बारामतीसारखा विकास करू
राज्यातील नगरपालिकांचा आगामी काळात बारामती आणि पिंपरी–चिंचवडसारख्या शहरांप्रमाणेच विकास करून दाखवू , अशी ग्वाही देत परतूरमध्येही मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.