बुलढाणा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर राहिलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी कामकाजाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोग्य क्षेत्राने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला असून या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात विविध वैद्यकीय संघटनांनी गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियपणामुळे सदर घटना घडल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील जयस्तंभ चौक, बाजार गल्ली आणि कारंजा चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या मोर्चात आयएमए, मगमो, मॅगमो, नीमा, डीए, होमिओपॅथिक असोसिएशन, नर्सिंग, युनानी, फिझिओथेरपी, पॅरामेडिकल, फार्मसी, सेव वसुंधरा आणि स्त्री मुक्ती संघटना अशा विविध वैद्यकीय संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. संपदा मुंंडे यांची आत्महत्या प्रशासकीय दुर्लक्षपणामुळे झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी 19 जून 2025 रोजी झालेल्या त्रासाबद्दल तक्रार दाखल केली होती. मात्र, तातडीने कारवाई न केल्यामुळे परिस्थिती विकोपाला गेली आणि निष्पाप वैद्यकीय अधिकाऱ्याला जीवन गमवावे लागले.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई व्हावी
डॉ. मुंडे यांच्या सुसाईड नोटमध्ये आणि तक्रार अर्जामध्ये आरोपींचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर तातडीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.