अंबड : तालुक्यातील रुई गाव शिवारात पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या विहीरी बुजल्या, पिके वाहून गेले. शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. तलावाच्या भिंतीला मध्यरात्री अचानक मोठे भगदाड पडून तलावातील संपूर्ण पाणी शेजारील शेतांमध्ये ओसंडून गेले. या दुर्घटनेत परिसरातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे पीक हातून गेले असून प्रचंड आर्थिक संकट कोसळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे रूई गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, पाझर तलावाची दुरुस्ती व देखभाल वेळेवर न झाल्याने अखेर शनिवारी रात्री तलावाच्या भिंतीला तडे गेले. काही क्षणात तलावातील पाण्याचा लोंढा लगतच्या शेतजमिनी आणि पिकांना उध्दवस्त करून गेला. शेतातील माती वाहून गेल्यामुळे जमीन ओसाड व नापीक होण्याच्या स्थितीत आली आहे. काही ठिकाणी पिके उखडून वाहून गेली आहे. दरम्यान परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने तलाव परिसरात जमा झाले. या घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली, परंतु महसूल व सिंचन विभागाकडून कोणीही घटनास्थळी तात्काळ पोहोचले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तलाव दुरूस्तीसाठी केली होती तक्रार
या पाझर तलावाला मागील वर्षीच धोका निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात होते. त्यामुळे तलावाच्या दुरुस्तीबाबत रूई येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा लेखी तक्रारी व मागण्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. तलावाची दुरुस्ती वेळेवर झाली असती तर आजचा हा अनर्थ टळला असता.
मदतीची प्रतिक्षा
रुई शिवारातील जवळपास २०० एकर क्षेत्र या दुर्घटनेत बाधित झाले आहे. सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरांसाठी ठेवलेले चाराही वाहून गेला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याचीच प्रतिक्षा आहे.