Akola Crime News: मुलगी नको असल्याची मानसीकता अजूनही काही भागामध्ये कायम असल्याचे महान येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले. पत्नीला चौथ्यांदा मुलगी झाल्याचे ऐकताच संतापलेल्या पतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्षाच्या दरवाजाच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे.
महान (जि. अकोला) : मुलगी नको असल्याची मानसीकता अजूनही काही भागामध्ये कायम असल्याचे महान येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले. पत्नीला चौथ्यांदा मुलगी झाल्याचे ऐकताच संतापलेल्या पतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्षाच्या दरवाजाच्या काचा फोडल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
सारकिन्ही येथील गरोदर महिला नीता पुंडलिक घोगरे (३०) यांना त्यांचे पती पुंडलिक पांडुरंग घोगरे (३८) याने काही नातेवाइकांसह ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता प्रसूतीकरिता महान प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या ठिकाणी स्टाफ नर्स सारिका पोहरे यांनी गर्भवती महिलेची प्रसूती केली. महिलेने रात्री ९:४० वाजता मुलीला जन्म दिला. पत्नीला चौथ्यांदा मुलगी झाल्याचे समजताच पती पुंडलिक घोगरे याने रागाच्या भरात प्रसूती वार्डच्या दरवाजावर बुक्की मारून काचा फोडल्या. अशी घटना प्रथमच घडली असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. या घटनेची तक्रार आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शारिक खान यांनी १२ ऑक्टोबर रोजी महान पोलिस चौकीमध्ये दिली. यावरून पिंजर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३२४ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महान पोलिस चौकीचे इंचार्ज सुभाष पारधी, संतोष वाघमारे करीत आहेत.
मी रात्री जेवण करीत रात्री ८:३० वाजताच्या सुमारा असताना, पुंडलिक घोगरे पत्नीला प्रसूतीकरिता नातेवाइकांसह महान प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. स्टाफ नर्स सारिका पोहरे यांनी गर्भवती महिलेची प्रसूती केली. महिलेने मुलीला जन्म दिल्याचे ऐकताच पुंडलिक घोगरे याने प्रसुती कक्षाच्या दरवाजावर बुक्की मारून काचा फोडल्या व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली.
– डॉ. शारिक खान, वैद्यकीय अधिकारी, महान.