Assembly Election: बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी तब्बल 21 लाख 24 हजार 227 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर 95 हजार 897 नवीन मतदारांचा समावेश झाला आहे.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात राज्यभर मतदान पार पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी तब्बल 21 लाख 24 हजार 227 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर 95 हजार 897 नवीन मतदारांचा समावेश झाला आहे. जिल्ह्यातील 2 हजार 288 मतदान केंद्रांवर मतप्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 23 नवीन तर 106 केंद्रांचे विलणीकरण करण्यात आल्याची माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानंतर राज्यभरात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. राज्यात एकाच टप्यात निवडणूक पार पडणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबरला अर्जाची छानणी प्रक्रिया होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहे. तद्नंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि 25 नोव्हेंबरच्या मतमोजणी नंतर राज्यात नवीन सत्ता स्थापन होणार आहे.
कोणत्या मतदारसंघात किती मतदार?
जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघ असून, एकूण 21 लाख 24 हजार 227 मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. यामध्ये मलकापूर विधानसभेत 2 लाख 87 हजार 445, बुलढाणा -3 लाख, 5 हजार 685, चिखली – 3 लाख 3 हजार 390, सिंदखेड राजा – 3 लाख 21 हजार 115, मेहकर- 3 लाख, 5 हजार 53, खामगाव- 2 लाख 96 हजार 605, जळगाव जामोद- 3 लाख, 4 हजार 934 अशी विधानसभा निहाय मतदारांची संख्या आहे.
23 नवीन मतदान केंद्र
विविध कारणास्तव तसेच मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी सात मतदार संघात 23 सोयीचे व नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली. यामध्ये मलकापूर येथे दोन, बुलढाणा – सहा, चिखली – पाच, सिं राजा- चार, मेहकर – एक, खामगाव चार तर ज. जामोद येथे दोन नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आली. मतदारांना मतदान कुठल्या ठिकाणी करावे लागणार, हे नवीन यादी नुसार स्पष्ट होईल.