Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचा विकास नाही, तर स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबियांच्या विकासासाठी काम केले, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथील सभेत केली. यासभेच्या निमित्ताने मोदींनी महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडला
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त कमिशन आणि मलाई खाण्याचे काम झाले, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक विकासकामांना ब्रेक लावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचा विकास नाही, तर स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबियांच्या विकासासाठी काम केले, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
ते सोमवारी चंद्रपूर येथील सभेत बोलत होते. चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. “लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली निवडणूक आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचे ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचे आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेले आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.