देऊळगाव राजा : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून भरदिवसा सराफा व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याच्या घटनेने सोमवारी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. विविध मार्गांवर शोधमोहीम सुरू झाली; मात्र काही तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर या कथित अपहरणामागील वेगळेच वास्तव समोर आले.

देऊळगाव राजा : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून भरदिवसा सराफा व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याच्या घटनेने सोमवारी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. विविध मार्गांवर शोधमोहीम सुरू झाली; मात्र काही तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर या कथित अपहरणामागील वेगळेच वास्तव समोर आले.
देऊळगाव मही येथील सराफा व्यापारी अनिरुद्ध मधुकर शिंगणे यांना तेलंगणा राज्यातील एलसीबी पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कारवाईची पद्धत आणि स्थानिक पोलिसांना माहिती नसल्यामुळे सुरुवातीला अपहरणाचा संशय निर्माण झाला होता. अनिरुद्ध शिंगणे हे सोने-चांदीच्या व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही सक्रिय आहेत. सोमवारी ते जमिनीच्या व्यवहारासाठी देऊळगाव राजा येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात आले होते. दुपारी कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांना बोलावले. आपण एलसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत या व्यक्तींनी शिंगणे यांना कारमध्ये बसवून तेथून नेले.हा प्रकार त्यांचे नातेवाईक तथा शिक्षक दशरथ चेके यांनी पाहिला. अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने शिंगणे यांना घेऊन गेल्याची माहिती परिसरात पसरताच अपहरणाची चर्चा सुरू झाली. काही वेळातच देऊळगाव मही आणि परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना संशयित वाहनाची माहिती देण्यात आली. जिल्ह्यासह शेजारील भागातही वाहनाचा शोध सुरू करण्यात आला.
अपहरणकर्ते नसून तेलंगणाचे पथक
साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित वाहन अडवण्यात आले. चौकशीअंती वाहनातील व्यक्ती अपहरणकर्ते नसून तेलंगणा राज्यातील एलसीबी पोलीस पथक असल्याचे समोर आले आणि संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.तेलंगणा पोलिसांनी सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या तपासाच्या अनुषंगाने अनिरुद्ध शिंगणे यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दुसऱ्या राज्यातील पोलिसांनी स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि देऊळगाव राजा ठाणेदार ब्रह्मा गिरी यांनी प्रकरणाची माहिती घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.


