शिरपूर: मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील मुख्य रस्त्यावरील चार दुकानांना रविवारी पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने चारही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस व ग्रामस्थांची मानवी साखळी; गॅस सिलेंडरचा संभाव्य स्फोट टळला
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील मुख्य रस्त्यावरील चार दुकानांना रविवारी पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने चारही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच शिरपूर पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मालेगाव, रिसोड आणि वाशिम येथील अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र, मालेगाव येथील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने मोठा फैलाव केला होता. त्यातही अग्निशमन वाहनातील पाण्याचा साठा अपुरा पडल्याने सुरुवातीच्या काळात आग नियंत्रणात आणताना अडचणी निर्माण झाल्या.
या गंभीर परिस्थितीत पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी पुढाकार घेत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांची मानवी साखळी तयार केली. बादल्या, हंडे आणि प्लास्टिक कॅनच्या साहाय्याने पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या सामूहिक प्रयत्नांमुळे चहाच्या हॉटेलमध्ये असलेले गॅस सिलेंडर आगीच्या विळख्यात येऊन स्फोट होण्यापासून वाचले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
यानंतर वाशिम व रिसोड नगरपरिषदांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
या भीषण आगीत पत्रकार कैलास भालेराव यांचे पुत्र आकाश भालेराव यांचे मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान पूर्णतः जळून खाक झाले. दुकानातील चार ते पाच मोटरसायकलींसह मोठ्या प्रमाणावर सुटे भाग, उपकरणे आणि इतर साहित्य जळून नष्ट झाले. तसेच बबन भांदुर्गे यांचे चहाचे हॉटेल, गजानन गाभणे यांचा वॉटर फिल्टर प्लांट आणि शेलगाव येथील इंगोले या युवकाचे कृषी साहित्य विक्रीचे दुकानही आगीत भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तातडीने परिसर सुरक्षित करून मदतकार्याला गती दिली. महसूल व संबंधित विभागाकडून पंचनामा सुरू असून नुकसानीचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


