मालेगाव : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तिवळी येथे शनिवारी सायंकाळी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गावाजवळील शेतातील विहिरीत पत्नी व दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळले, तर त्यापासून अवघ्या दहा फूट अंतरावरील इलेक्ट्रिक टॉवरला कुटुंबप्रमुखाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

विहिरीत पत्नी व दोन मुलांचे मृतदेह; टॉवरला पतीचा गळफास
मालेगाव : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तिवळी येथे शनिवारी सायंकाळी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गावाजवळील शेतातील विहिरीत पत्नी व दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळले, तर त्यापासून अवघ्या दहा फूट अंतरावरील इलेक्ट्रिक टॉवरला कुटुंबप्रमुखाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार, संतोष तुकाराम बकाल (वय अंदाजे ३५) यांचे गावापासून सुमारे ५०० ते ७०० मीटर अंतरावर शेत आहे. या शेतातील विहिरीमध्ये त्यांची मुलगी जान्हवी (वय ८) व मुलगा सोहम (वय ६) यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले. तसेच पत्नी वर्षा बकाल (वय २८) हिचा मृतदेहही त्याच विहिरीत आढळला.
दरम्यान, विहिरीपासून अवघ्या दहा फूट अंतरावर असलेल्या इलेक्ट्रिक टॉवरला संतोष बकाल यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही धक्कादायक घटना १३ जून दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
संतोष बकाल यांच्याकडे सुमारे अडीच एकर शेती असून ते मेहनती व काटकसरी शेतकरी म्हणून गावात परिचित होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके कारण काय, याबाबत गावात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
मात्र, ही घटना नेमकी कशी घडली, त्यामागे कौटुंबिक, आर्थिक की अन्य कोणते कारण आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नसून शिरपूर पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत.
चौघांच्या मृत्यूने गाव सुन्न
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरताच तिवळी गावावर शोककळा पसरली. गावातील मेहनती व सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे संतोष बकाल आणि त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ ओढवेल, यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पत्नी व दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह विहिरीत आणि संतोष बकाल यांचा मृतदेह टॉवरला लटकलेल्या अवस्थेत पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.


