मानोरा : पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीच्या पात्रात स्नान व पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १४) सकाळी गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. या दुर्घटनेत शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) व त्याचा आतेभाऊ दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंझोरीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

गोमुखेश्वर संस्थानजवळील दुर्घटना; इंझोरी व भातकुली गावांवर शोककळा
मानोरा : पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीच्या पात्रात स्नान व पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १४) सकाळी गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. या दुर्घटनेत शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) व त्याचा आतेभाऊ दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंझोरीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या अधिक महिन्यानिमित्त रविवारी सकाळी शुभम व दर्शन हे दोघे गोमुखेश्वर संस्थान परिसरातील अडाण नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी गेले होते. स्नानानंतर दोघेही नदीत पोहत असताना पात्रातील खोल गड्ड्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. क्षणार्धात दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. दरम्यान, नदीकाठावर खेळत असलेल्या काही मुलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. मुलांचा आक्रोश ऐकताच नदीपात्रात मासेमारी करणारे स्थानिक कोळी बांधव आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी जीवाची पर्वा न करता शोधमोहीम राबवून दोघांनाही पाण्याबाहेर काढले.

घटनेची माहिती गावात पोहोचताच धोंडे व वावगे कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी नदीकाठाकडे धाव घेतली. गावातील युवक विशाल वानखेडे यांनी तत्काळ आपले चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले. बेशुद्ध अवस्थेतील शुभम आणि दर्शन यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले. ही माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रश केला.
धोंडे कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेला शुभम हा अमोल धोंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गेल्या वर्षभरापासून आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत होता. अध्यात्म, भजन-कीर्तन आणि धार्मिक संस्कारांचे धडे घेत असलेला शुभम उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त काही दिवसांपूर्वीच गावी परतला होता. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या शुभमचा आणि त्याच्या आतेभावाचा असा अंत झाल्याने धोंडे व वावगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नदीपात्रातील खोलगट भाग ठरला जीवघेणा
गोमुखेश्वर परिसरातील अडाण नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल गड्डे असून पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. याच खोलगट भागात दोघे अडकल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अधिक महिन्यानिमित्त नदीकाठी भाविकांची वर्दळ वाढत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


