मानोरा : शासनाच्या महा आवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मानोरा तालुक्यातील वाई गौळ ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश राठोड महाराज यांचा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रभावीपणे राबविल्याबद्दल वाई गौळ ग्रामपंचायतीची राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये निवड करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण सोहळ्यात सरपंच उमेश राठोड महाराज यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रामविकासाचा ध्यास घेत विविध शासकीय योजना व अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे.
वाई गौळ ग्रामपंचायतीला मिळालेल्या या राज्यस्तरीय यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून ग्रामपंचायतीचे नाव राज्यभर पोहोचले आहे. सरपंच उमेश राठोड महाराज यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशाबद्दल गावासह विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.