जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अडकून पडल्याने जिल्ह्यात मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. सुमारे 23 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला असून बाजार समितीतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या परिस्थितीचा थेट फटका शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी, शेतकरी-हमाल वर्ग अडचणीत; व्यवहार ठप्प, प्रशासनावर तोडगा काढण्याचा दबाव
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अडकून पडल्याने जिल्ह्यात मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. सुमारे 23 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला असून बाजार समितीतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या परिस्थितीचा थेट फटका शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

नियमांनुसार बाजार समितीत विक्री झालेल्या शेतीमालाचे पैसे शेतकऱ्यांना 24 तासांत देणे बंधनकारक आहे. मात्र व्यापाऱ्यांचेच पैसे बँकेत अडकून पडल्याने त्यांच्याकडे व्यवहारासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. परिणामी, व्यापाऱ्यांनी तातडीने खरेदी-विक्री व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, संबंधित बँकेतील 23 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

बेमुदत बंदमुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा फटका केवळ व्यापाऱ्यांनाच नव्हे, तर शेतकरी, हमाल आणि इतर कामगार वर्गालाही बसत असून त्यांच्या रोजंदारीवर परिणाम झाला आहे. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
असंघटित कामगार संघटनेने व्यापाऱ्यांनी तातडीने व्यवहार सुरू करावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर बाजार समिती प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.
एकीकडे बँक घोटाळ्याची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे त्याचे गंभीर आर्थिक पडसाद बाजार समितीवर उमटत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.