वाशिम : जिल्ह्यातील कृषी सामग्री विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व कृषी विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने सोमवारपासून अनिश्चितकालीन बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील तब्बल 1325 कृषी सेवा केंद्रांनी सहभाग घेत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली आहेत.

‘लिंकिंग’मुळे आर्थिक ताण; खत वितरण व मार्जिन वाढीच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
वाशिम : जिल्ह्यातील कृषी सामग्री विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व कृषी विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने सोमवारपासून अनिश्चितकालीन बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील तब्बल 1325 कृषी सेवा केंद्रांनी सहभाग घेत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली आहेत. परिणामी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संघटनेच्या माहितीनुसार, बीज, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीत येणाऱ्या विविध अडचणींबाबत राज्याच्या कृषिमंत्र्यांसह प्रधान सचिव, कृषी आयुक्त व कृषी संचालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, यापैकी कोणत्याही मागणीवर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत 27 एप्रिलपासून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष कृषी व्यावसायिकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये रासायनिक खत कंपन्यांकडून करण्यात येणारी ‘लिंकिंग’ पद्धत तातडीने बंद करणे, अप्रमाणित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर बंदी घालणे, सीलबंद पॅकेजिंगमध्येच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीची सक्ती, दोषी बियाणे किंवा खतांच्या प्रकरणात विक्रेत्यांना आरोपी न ठरवता साक्षीदार म्हणून ग्राह्य धरणे, प्रमाणित बियाण्यांसाठी सोपी व स्वतंत्र पोर्टल व्यवस्था निर्माण करणे यांचा समावेश आहे.

तसेच रासायनिक खतांचा पुरवठा ‘फॉर’ पद्धतीने करणे, विक्रीवरील नफा (मार्जिन) वाढवणे, खरीप 2026 साठी युरिया व डीएपी वितरण प्रक्रियेबाबत जारी परिपत्रकाचा पुनर्विचार करणे, कंपन्यांनी कालबाह्य कीटकनाशके परत घेणे, तसेच निकृष्ट व अवैध कीटकनाशके, तणनाशके आणि बायोपेस्टिसाइड्सवर नियंत्रण आणणे या मागण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद असल्याने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पेरणीपूर्व काळात आवश्यक असलेली खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.


