वॉशिंग्टन : येथील वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यान शनिवारी रात्री अचानक गोळीबार झाला. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थानी हलवले. ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

वॉशिंग्टन : येथील वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यान शनिवारी रात्री अचानक गोळीबार झाला. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थानी हलवले. ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी या सर्व बड्या नेत्यांना तातडीने तेथून बाहेर काढले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने गोळ्या झाडल्या होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुमारे ५ ते ८ गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकला. गोळीबार सुरू होताच हॉलमध्ये उपस्थित असलेले शेकडो पत्रकार आणि दिग्गज व्यक्तींनी जीव वाचवण्यासाठी टेबलांखाली आश्रय घेतला. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण बँक्वेट हॉलला वेढा घातला आणि ‘नॅशनल गार्ड’च्या जवानांनीही इमारतीचा ताबा घेतला. या घटनेनंतर हल्लेखोरास पकडण्यात आले आहे.
हल्लेखोराच्या निशाण्यावर मीच होतो : ट्रम्प
व्हाईट हाऊस डिनरदरम्यान झालेल्या अचानक गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या कार्याचे कौतुक केले आणि हल्लेखोराला पकडण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ही घटना पूर्णपणे अनपेक्षित होती, परंतु सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने आणि धैर्याने परिस्थिती हाताळली. हल्लेखोराच्या निशाण्यावर मीच होतो, असे मला वाटते. अद्याप हल्ल्याच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
लोकशाहीत हिंसेला स्थान नाही : मोदी
डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस हे सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही, हे जाणून दिलासा मिळाला, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी शुभेच्छाही दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही लोकशाहीत हिंसेला स्थान नसते आणि अशा घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला पाहिजे.


