कोची : प्रसिद्ध मल्याळम टीव्ही अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोची : प्रसिद्ध मल्याळम टीव्ही अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री सीमा. जी नायर यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सिद्धार्थ यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, “सिद्धार्थ जवळपास दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. दोघांनी आपल्या कारकिर्दीत ‘कस्तूरीमन’ आणि ‘भाग्यजातकम्’ यांसारख्या टीव्ही सिरियलमध्ये काम केले आहे.” ही माहिती समोर येताच, त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले, “सर्व आशा आता मावळल्या आहेत. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल आता हयात नाहीत. या जगातून त्यांनी निरोप घेतला, जिथे वेदना नाही. गेल्या दोन वर्षांपासून मी तुमच्यासाठी लढत राहिले. माझे मन आणि शरीर पूर्णपणे थकून गेले असतानाही, तुमचा जीव वाचवण्यासाठी मी धावपळ करत राहिले. आज देवाने ठरवले आहे की, तुला आता आणखी त्रास होऊ नये…सिद्धार्थ मी हे सहन करु शकत नाही, मी पूर्णपणे खचले आहे..”, अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.
अॅक्टर किशोर सत्याने सिद्धार्थ यांना श्रध्दांजली वाहिली आहे. ते म्हणाले, ‘आम्ही आणखी एका कलाकाराला खूप लवकर गमावले आहे. सिद्धार्थ वेणुगोपाल हा टीव्ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक ओळखीचा चेहरा होता. काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. सीमा यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली. मी प्रार्थना करतो, सिद्धार्थ यांच्या आत्म्याला शांती मिळो’, सिद्धार्थ वेणुगोपाल यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना रंगभूमीतील नाटकांमध्ये भाग घेतला. निर्माते अरुण घोष यांच्या पाठिंब्याने त्यांनी टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते.


