Young man murdere : आईची छेड काढल्याच्या संशयातून संतापाच्या भरात एका २५ वर्षीय तरुणाचा झोपेतच गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना सिरसवाडी (ता. जालना) येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

सिरसवाडीतील थरारक घटना; अल्पवयीन आरोपी काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
जालना : आईची छेड काढल्याच्या संशयातून संतापाच्या भरात एका २५ वर्षीय तरुणाचा झोपेतच गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना सिरसवाडी (ता. जालना) येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत निखिल वाघमारे आणि आरोपी अल्पवयीन तरुण हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. मात्र, निखिल हा आरोपीच्या आईची छेड काढत असल्याच्या संशयावरून आरोपीच्या मनात संताप साचत गेला. अखेर या रागातून त्याने टोकाचे पाऊल उचलत खुनाचा कट रचला.
शुक्रवारी रात्री सुमारास झालेल्या पार्टीनंतर निखिल गाढ झोपेत असताना आरोपीने त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात निखिलचा जागीच मृत्यू झाला. घटना समजताच गावात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. फरार होण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन आरोपीला काही तासांतच जेरबंद करण्यात आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
शनिवारी (दि. ११ एप्रिल) सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. त्यानंतर दुपारी शिरसवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे किरकोळ कारणांवरून वाढत चाललेल्या गंभीर गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


