dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जनगणनेसाठी जिल्हाधिकारी नागरिकांच्या दारात; नागरिकांना सहकार्याचे आवाहन | census

census : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जनगणना प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून वाशिम तालुक्यातील काटा तसेच शहरातील सिव्हिल लाईन परिसरात बुधवारी क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरभेटी देत रंगीत तालीम पार पडली. 

वाशिम : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जनगणना प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून वाशिम तालुक्यातील काटा तसेच शहरातील सिव्हिल लाईन परिसरात बुधवारी क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरभेटी देत रंगीत तालीम पार पडली. या उपक्रमातून नागरिकांना जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती देण्यात आली.

प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेचा कणा असून अचूक माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी नोंदणी प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रात्यक्षिकादरम्यान क्षेत्रीय प्रशिक्षकांनी घरभेटी देत माहिती संकलनाची पद्धत, विचारले जाणारे प्रश्न तसेच डिजिटल साधनांचा वापर याचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर केले. यामुळे नागरिकांच्या शंकांचे निरसन होऊन जनगणनेबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे दिसून आले.

यावेळी जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, परिविक्षाधीन तहसीलदार आकाश वर्मा व निलेश पळसकर, चार्ज अधिकारी निलेश गायकवाड, मास्टर ट्रेनर डॉ. राजेश गवई, कार्तिक गडलिंग, मालेगाव तहसीलदार दीपक पुंडे, जनगणना जिल्हा समन्वयक शशांक रूखने, नायब तहसीलदार साहेबराव नप्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित अधिकाऱ्यांनी मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत प्रशिक्षकांना आवश्यक सूचना दिल्या. या उपक्रमामुळे जनगणना २०२७ ची पूर्वतयारी अधिक भक्कम होत असून प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होत आहे. यावेळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top