वाशिम : प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चालत्या बसमध्ये दागिने व रोकड चोरणाऱ्या महिला टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.

वाशिम : प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चालत्या बसमध्ये दागिने व रोकड चोरणाऱ्या महिला टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. १३ मार्च रोजी निर्मला दिलीप श्रीनाथ (रा. रिसोड) या उमरखेडकडे बसने प्रवास करत असताना अनसिंगजवळ त्यांच्या पर्सची चोरी झाली होती. पर्समध्ये सोन्याची पोथ व रोख रक्कम होती. याप्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार २० मार्च रोजी वाशिम बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही महिलांवर पाळत ठेवण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत संबंधित महिलांना ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या मदतीने त्यांची चौकशी केली असता त्यांनी १३ मार्च रोजी चालत्या बसमध्ये एका महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मी व्यंकटेश गड्डी (वय ३५), कविता अशोक गड्डी (वय ३०) व गंगम्मा उलगया गड्डी (वय ५०), सर्व रा. चिखलठाणा, जि. संभाजीनगर यांचा समावेश आहे. पोलीसांनी आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास अनसिंग पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. या महिलांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बाइक चोरटा पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, पोलीस स्टेशन रिसोड येथील गुन्हा क्र. ११८/२०२६ च्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संतोष सुदाम पवार (रा. रिसोड, जि. वाशिम) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेली मोटारसायकल हस्तगत करून पोलीस स्टेशन रिसोडच्या ताब्यात देण्यात आली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून परिसरातील आणखी चोरीच्या मोटारसायकली उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम), सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि शेखर मास्कर व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली आहे.
