पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग : मुख्यमंत्री
पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
किल्ले शिवनेरीवर 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता, असे नमूद करून फडणवीस म्हणाले की, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिवनेरी किल्ला विचार आणि कार्याचे प्रेरणास्थळ : पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.
