वाळू माफियांनी थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घातला जेसीबी : १२ किमी फिल्मी पाठलाग ; ९ जणांवर गुन्हे दाखल

भोकरदन : तालुक्यात वाळू माफियांच्या मुजोरपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला जिवे मारण्याचा प्रयत्न माफियांकडून करण्यात आला. मात्र अधिकार्‍यांनी न डगमगता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे. 

भोकरदन : तालुक्यात वाळू माफियांच्या मुजोरपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला जिवे मारण्याचा प्रयत्न माफियांकडून करण्यात आला. मात्र अधिकार्‍यांनी न डगमगता तब्बल १२ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून अवैध जेसीबी जप्त केला आहे. याप्रकरणी ९ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध वाळू उपशाविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत काल रात्री ९ वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या पथकाने जवखेडा ठोंबरे येथील पूर्णा नदी पात्रात छापा टाकला. यावेळी घटनास्थळी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि एक जेसीबी (एमएच 21 सीजी 2732) वाळू उपसा करताना आढळले. पथकाने कारवाईला सुरुवात करताच, एका पांढऱ्या कारसह पाच दुचाकींवरून आलेल्या टोळीने अधिकाऱ्यांचा रस्ता अडवला. कारवाई केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत माफियांनी महसूल पथकाच्या अंगावर चक्क जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. या वाळू माफियांच्या टोळीने महसूल पथकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्यानंतर तेथून जेसीबी व इतर वाहने घेऊन पळ काढला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अधिकाऱ्यांनी या वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा पाठलाग केला.

 – १२ किलोमीटरचा थरार !

अंधाराचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन आणि तहसीलदार काकडे यांनी स्वतःच्या वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला. हा थरारक पाठलाग सुमारे १२ किलोमीटर चालला. शेवटी निमखेडा शिवारातील एका मक्याच्या शेतात लपवून ठेवलेला जेसीबी शोधून काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले आणि तो जप्त करण्यात आला.

 – ९ जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणी तलाठी अविनाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून गजानन ठोंबरे, परमेश्वर ठोंबरे यांच्यासह ९ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

   – यापुढे मकोका अंतर्गत कारवाई

  वाळू माफियांचे धाडस किती वाढले, हे अशा घटनांवरून दिसत आहे, यापुढे वाळू माफियाच नव्हे, तर अधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून माफियांना ‘लोकेशन’ देणाऱ्या व पाळत ठेवणाऱ्यांवरही आता ‘एमपीडीए’ आणि हद्दपारीची कडक कारवाई केली जाईल.

 – बी. सरवनन, उपविभागीय अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »