खुलताबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री. घृष्णेश्वर मंदिर वेरूळ येथे “हर हर महादेव” आणि “जय शिव शंकर”बम बम भोले च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लाखो शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. मात्र या भक्तीमय वातावरणाला नियोजनाच्या अभावाची किनार लागल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे भाविकांनी काही वेळ गोंधळ घालत संताप व्यक्त केला.

खुलताबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री. घृष्णेश्वर मंदिर वेरूळ येथे “हर हर महादेव” आणि “जय शिव शंकर”बम बम भोले च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लाखो शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. मात्र या भक्तीमय वातावरणाला नियोजनाच्या अभावाची किनार लागल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे भाविकांनी काही वेळ गोंधळ घालत संताप व्यक्त केला.
भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याने मंदिर परिसरात मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या सुमारास पूर्व द्वार आणि दक्षिण द्वार याठिकाणी नियंत्रण सुटल्याचे दिसून आले. अनेक भाविक मिळेल त्या दरवाजाने, मिळेल त्या जागेतून उड्या मारत दर्शन रांगेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. परिणामी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या गोंधळात अनेक महिला व लहान मुलांच्या पायांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या असून काहींना किरकोळ जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, विविध बैठका घेऊन नियोजन झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी न झाल्याने “बैठका नेमक्या कशासाठी?” असा संतप्त सवाल भाविकांकडून उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असताना प्रवेशद्वार, रांग व्यवस्थापन, महिला-बालकांसाठी स्वतंत्र मार्ग आणि आपत्कालीन सुविधा यांचा अभाव स्पष्टपणे जाणवला. याच दरम्यान वेरूळमधील एका प्रतिष्ठित नागरिकाला मध्यरात्री आधार कार्ड दाखवूनही, पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की व अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून “भाविकांशी अशी वागणूक योग्य आहे का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, रांगेत उभ्या असलेल्या हजारो भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचेही दिसून आले. परिणामी भाविक तासंतास त्रस्त अवस्थेत उभे राहिल्याचे चित्र होते. लाखो भाविकांचा प्रश्न असताना केवळ बैठका घेऊन भागत नाही; त्याची परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा शिवभक्तांचा रोष वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिवभक्तांचा सन्मान राखला गेला पाहिजे. नियोजना शिवाय भक्तीमय सोहळे सुरक्षित होऊ शकत नाहीत, अशा भावना भाविकांनी यावेळी व्यक्त केल्या आहे.
