वाशिम : केंद्र क्रमांक ०९०६ येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सामुदायिक कॉपी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाच्या अचानक तपासणीत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी शब्दशः एकसारखी उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले.

१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पथकाने केंद्राची पाहणी केली असता एकूण ५८४ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ५८१ उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहणीत अत्यंत दाटीवाटीची बसण्याची व्यवस्था, टिनशेडमध्ये परीक्षा, अपुरी प्रकाशयोजना, पंख्यांची कमतरता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अपुरी संख्या तसेच वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा नसणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या. संपूर्ण केंद्रात केवळ ८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते.
उत्तरपत्रिकांच्या नमुना तपासणीत बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे समान असल्याचे स्पष्ट झाले. काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन व पेन्सिलने खूणा केल्याचेही आढळून आले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही केंद्रास भेट दिली.
तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊन केंद्रात फिरत असल्याचे आढळले. मोबाईल तपासणीस टाळाटाळ केल्यानंतर अखेर दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
भरारी पथकाच्या अहवालात उपस्थित ५८१ विद्यार्थ्यांनी सामुदायिक कॉपी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवाल, उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या सुविधा आणि जप्त मोबाईल यांच्या आधारे केंद्र क्रमांक ०९०६ येथे गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होत असून दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.